logo

श्री शिवाजी विद्यालय रिसोड येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून यशस्वी पर्यावरण शिक्षण कार्यक्रम

श्री शिवाजी विद्यालय रिसोड येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून यशस्वी पर्यावरण शिक्षण कार्यक्रम

महेंद्र कुमार महाजन
रिसोड

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून भव्य पर्यावरण शिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक संजय नरवाडे होते. मार्गदर्शक म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी ए. बी. इढोळे, वनपाल एन. एस. डिघोळे, वनरक्षक आर. एस. कदम, पी. आर. जावळे, आडे, डांगे आदी वनकर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुशाल राठोड यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक एन. एस. डिघोळे यांनी पर्यावरण जनजागृती व पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी लवकरच जंगल सफारीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात उपमुख्याध्यापक संजयराव नरवाडे यांनी वन व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विशद केले.
ऊर्जा बचत, पाणी बचत, घनकचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत, ध्वनी प्रदूषण, शाश्वत शेती, हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास, जैवविविधता, माझे आरोग्य माझे पर्यावरण, औषधी वनस्पती उद्यान आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक मॉडेल्स व चित्रकला पोस्टर्स सादर करून भव्य प्रदर्शनी भरविली. प्रदर्शनीची पाहणी करून परीक्षकांनी गुणांकन केले.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे —
प्रथम क्रमांक : पाणी बचत मॉडेल — कुमारी वेदांती दीपकराव देशमुख, नयना ज्ञानेश्वर सावके, दिव्या ज्ञानेश्वर सावके
द्वितीय क्रमांक : घनकचरा व्यवस्थापन व ऊर्जा बचत मॉडेल — शेख जाहीर, आरिश खान, शेख अश्फाक
तृतीय क्रमांक : ऊर्जा व पाणी बचत मॉडेल — साची सुनील देशमुख, सृष्टी भागवत नरवाडे
चित्रकला व पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक साची सुनीलराव देशमुख, द्वितीय क्रमांक रुद्राक्षी संजय खोडके, तर तृतीय क्रमांक वेदांती दीपकराव देशमुख यांनी पटकाविला.
विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पदके तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक व राष्ट्रीय हरित सेना प्रमुख विठ्ठल सरनाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन खुशाल राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी वन विभागातर्फे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रकल्पांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

27
3285 views