गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह एकाला अटक
धुळे : स्थानिक गुन्हा शाखेने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे, दुचाकी आणि मोबाइल असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव विठ्ठल वामन भोळे (वय ५२, रा. भादली, ता.जि. जळगाव) असे आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास मोहाडी गावाच्या शिवारात सर्व्हिस रोडवर ही कारवाईकेली. या ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीच्या पिस्टलसह तीन हजार रुपये किमतीचे ३ जिवंत काडतुसे, तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्रमांक एमएच १५, जेव्ही ४३८६) व १० हजार रूपये किमतीचा मोबाइल असा एकूण एकूण सुमारे ७४ हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला. आरोपी पुणे जिल्ह्यातील आकुर्डी परिसरात राहत असून, तो धुळ्यात शस्त्र कशासाठी घेऊन आला होता, याचा तपास आता पोलिस करत आहेत.