logo

सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवणार – संजय पवार

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी
जळगाव प्रतिनिधी :
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवार, दि. २४ रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. गणेश कॉलनीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या मुलाखतींमध्ये एकूण सुमारे १२५ ते १५० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून या प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
सध्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती अस्तित्वात असून जागावाटपाबाबत भाजपकडून चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत, तर पक्ष स्वबळावर महापालिका निवडणूक लढवेल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मांडली.
मुलाखती घेण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महानगर अभिषेक पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, भाजप तसेच इतर पक्षांतील नाराज इच्छुक उमेदवारही राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती देण्यात आली. तसेच पक्षाचे स्वतःचेही सक्षम उमेदवार उपलब्ध असल्यामुळे, महायुतीत योग्य जागा न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवून किमान २५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवेल, असे संजय पवार यांनी सांगितले.
महायुतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप अंतिम व स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

0
0 views