logo

अनिल किरणपुरे यांची राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड


साकोली तालुक्यातील लवारी येथील आदर्श युवा शेतकरी अनिल शिवलाल किरणपुरे यांची त्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची दखल घेत राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ही निवड श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था शेडेपार, धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी व देवरी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.अनिल किरणपुरे यांनी आधुनिक व शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करून शेतीला नवे स्वरूप दिले आहे. त्यांनी ड्रिप सिंचन, मल्चिंग, तुषार सिंचन, सेंद्रिय शेती यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून उत्पादनात दुपटीहून अधिक वाढ साध्य केली आहे.शेतीसोबतच त्यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, गोपालन व दुग्ध व्यवसाय सुरू करून बहुआयामी उत्पादनाचा आदर्श निर्माण केला आहे. ते केवळ शेतकरी न राहता इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणूनही कार्य करत आहेत. शेतीशाळा, चर्चासत्रे, कृषी मेळावे, प्रदर्शन तसेच महाविद्यालयीन व्याख्याने व प्रत्यक्ष शेतीदर्शनाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.कृषी कार्यालय साकोली, कृषी विज्ञान केंद्र साकोली व पंचायत समिती साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग यशस्वीपणे राबवले. शेती विकासासोबतच पर्यावरण संवर्धन, सामाजिक प्रबोधन व युवा सशक्तीकरणासाठीही ते उल्लेखनीय कार्य करत आहेत.आजपर्यंत अनिल किरणपुरे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार, प्रगतशील युवा शेतकरी पुरस्कार, भाऊसाहेब माने कृषी गौरव पुरस्कार, उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार, पर्यावरण संवर्धन गौरव पुरस्कार आदी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दि. ४ जानेवारी २०२६ रोजी देवरी येथील धुकेश्वरी मंदिर सभागृहात करण्यात आले आहे. या निवडीमुळे भंडारा जिल्ह्यातील नवोपक्रमशील शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

1
628 views