logo

वेळ अमावस्या - 19 डिसेंबर 25 शुक्रवार - मातीशी नाळ जोडणारा शेतकर्यांचा लोकोत्सव!

अनोखा लातूर पॅटर्न: 'वेळ अमावस्या'
-मातीशी नाळ जोडणारा लोकोत्सव!

मराठवाड्याचे ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळी लातूरच्या कृषी संस्कृतीला तंतोतंत लागू पडतात. ते म्हणतात,

*"काळ्या आईची कुशी, पिकं जोमाने डुलती,*
*माझ्या राजाचं हे रान, जणू हिरवं सोनं..."*

या ओळींचा खरा प्रत्यय लातूरच्या 'वेळ अमावस्येला' येतो. हा केवळ एक सण नाही, तर हा मातीशी नाळ जोडणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण लातूर जिल्हा शेतात असतो, निसर्गाच्या ऋणाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरा केला जातो.

येळवस, दर्शवेळ किंवा वेळ अमावस्या अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सणाची परंपरा तब्बल सातशे वर्षांची आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा हा भाग पूर्वी निझाम राजवटीत असल्याने येथे कानडी भाषेचा प्रभाव आजही जाणवतो. कानडीत 'वेल्ली' म्हणजे पीक. पिकांची पूजा म्हणून हा शब्द रूढ झाला असावा. तसेच निसर्गाची योग्य 'वेळ' साधणे म्हणजे हा सण होय. एरवी अमावास्या अशुभ मानली जाते, पण लातूरमध्ये ही अमावास्या शेतकऱ्यांसाठी 'पर्वणी' असते. या दिवशी शहरातील घरे बंद असतात आणि शिवार माणसांनी फुलून जाते.

या उत्सवाचे स्वरूप पूर्णपणे निसर्गपूजेचे आहे. शेतकरी शेतात कडब्याची 'कोपी' बांधतात. तिचे तोंड पूर्वेकडे असते, जे समृद्धीचे लक्षण मानले जाते. कोपीमध्ये पाच दगड मांडून त्यांची 'पंचमहाभूते' किंवा 'पांडव' म्हणून पूजा केली जाते. मूर्तीची नाही, तर मातीची आणि उभ्या पिकांची पूजा या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती दिली जाते. शेतात पेटवलेल्या चुलींच्या धुरामुळे पिकांवरील कीड नष्ट होते, तर नैवेद्यासाठी आलेले पक्षी पिकावरील अळ्या वेचतात. म्हणजेच कृषी विज्ञान आणि परंपरेचा हा एक अनोखा संगम आहे.

या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे चविष्ट आणि आरोग्यदायी 'वनभोजन'. बाजरीची भाकरी, अनेक पालेभाज्यांपासून बनलेली पौष्टिक 'भज्जी', ज्वारीच्या पिठाची 'आंबिल' ही या दिवसाची खास मेजवानी असते. थंडीच्या दिवसांत हे पदार्थ शरीरासाठी औषधी ठरतात. विशेष म्हणजे या दिवशी सर्व जाती-धर्मातील सर्वजण एकाच पंगतीत जेवतात, यातून सामाजिक समतेचे दर्शन घडते. या सणामुळे बाजारपेठेत कोटींची उलाढाल होते आणि जिल्ह्याचे अर्थचक्र गतिमान होते.

थोडक्यात सांगायचे तर, वेळ अमावस्या हा केवळ एक सण नसून निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करणारी लातूरकरांची ती एक समृद्ध अशी जगावेगळी जीवनशैली आहे.

-डॉ. श्याम टरके,
सहायक संचालक (माहिती),
विभागीय १ माहिती कार्यालय, लातूर.- -वृत संकलन -बालाजी पडोळे शिरूर ताजबंद .

1
67 views