शहाद्यात भरचौकातून बँकेची ३० लाख रकमेची बॅग लंपास
शहादा : स्टेट बँकेतून काढून आणलेले ३० लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शहाद्यातील गजबजलेल्या स्टेट बँक चौकात शुक्रवारी दुपारी घडली.स्टेट बँकेच्या धडगाव शाखेत ग्राहक केंद्रांना वितरित करण्यासाठी ८० लाख रुपयांची रक्कम घेण्यासाठी तेथील कर्मचारी सुरक्षा रक्षकांसह शहादा स्टेट बँकेत आले होते. बँकेतून रक्कम घेऊन ते कारमध्ये ठेवत असताना दुचाकीवरील एकाने येऊन वाहनाच्या चाकाखालीकाहीतरी अडकले असल्याचे चालकाला सांगितले. चालकाने खाली पाहिले असता क्षणार्थात दुचाकीवरील दुसऱ्याने मागील सीटवर ठेवलेली बॅग घेऊन पसार झाला. त्यात ३० लाखांची रक्कम होती. ही बाब येताच आरडाओरड करण्यात आला. पोलिसांनी नाकाबंदी करून, सीसीटीव्ही फुटेज तपासून शोधकार्य सुरू केले, परंतु उपयोग झाला नाही. ग्राहक सेवा केंद्राचे संचालक रोहिदास पावरा यांच्या फिर्यादीवरून शहाद्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.