logo

महाराष्ट्रातील विज्ञान प्रदर्शनाला नवी दिशा — ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजनेला हिरवी झेंडी मिळणार?

महाराष्ट्रातील विज्ञान प्रदर्शनांच्या उद्दिष्टांना आणि व्याप्तीला नवी दिशा देणारी “मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी” ही संकल्पना राज्यात जोरदार चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक कुतूहलाला प्रोत्साहन देणे, त्यांना प्रत्यक्ष जागतिक स्तरावरील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणे, या व्यापक हेतूने ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या क्रांतिकारक संकल्पनेविषयी सभागृहात शिक्षक-आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधी विधान करत शासनाचे लक्ष वेधले. त्यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अतिशय सकारात्मक भूमिका मांडल्याने ही योजना लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता बळावली आहे.

सध्या राज्यात तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना प्रयोगशीलता, संकल्पनांची मांडणी, नवकल्पना आणि संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ही प्रदर्शनं उपयोगी ठरतात. तथापि, विज्ञानाची खरी ओळख विद्यार्थ्यांना तेव्हा मिळते, जेव्हा ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संस्थांचे प्रत्यक्ष निरीक्षण करतात. याच भावनेतून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी “मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी” ही अभिनव संकल्पना पुढे मांडली.

या प्रस्तावानुसार तालुका स्तरावर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नागपूर येथील रमण सायन्स सेंटरला भेट देण्याची संधी देण्यात यावी. जिल्हास्तरीय उत्कृष्ट विद्यार्थ्यांना बेंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) केंद्राला नेऊन तिथे सुरू असलेले उपग्रह संशोधन, रॉकेट विकास आणि अवकाश अभियंत्रिकी प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव द्यावा. तर राज्यस्तरीय सर्वोत्तम विद्यार्थ्यांना थेट अमेरिका, वॉशिंग्टन येथील जगप्रसिद्ध नासा संशोधन केंद्राला भेट देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून द्यावी, असा मोहक प्रस्ताव त्यांच्या विधानात मांडण्यात आला.

नासा केंद्रातील प्रगत तंत्रज्ञान, अवकाश मोहिमा, वैज्ञानिक प्रयोगशाळा, उपग्रह नियंत्रण केंद्र आणि संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकतात. अशा अनुभवा नंतर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची जिज्ञासा वाढेल, संशोधन करण्याची तयारी निर्माण होईल आणि विज्ञान क्षेत्रात राज्यातील युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला.

या प्रस्तावावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शासन विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक प्रगतीसाठी सकारात्मक आणि ठोस पावले उचलण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. राज्यातील विज्ञान शिक्षण अधिक प्रभावी व जागतिक दृष्टीकोनातून सक्षम व्हावे, यासाठी अशा योजनांचा गांभीर्याने विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संकल्पनेची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील विज्ञान प्रदर्शनांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सहभाग, तसेच विज्ञान क्षेत्रातील पुढील शिक्षण आणि संशोधनाची दिशा या सर्वांमध्ये मोठा बदल घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारी ही योजना प्रेरणेचा नवा अध्याय ठरू शकते.

राज्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गामध्ये “मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी” या योजनेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, विज्ञानाच्या दिशेने महाराष्ट्र एक नवा पाऊल उचलणार असल्याची आशा सर्वत्र व्यक्त होत आहे.

1
55 views