logo

जनता विद्यालयात संविधान दिन सप्ताह संपन्न


पिंपळगाव सराई : जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन सप्ताहाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सर्वांनी एकत्रितपणे करत लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी भूषवले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश खंडारे, वर्ग दहावीची विद्यार्थीनी कु. सायली खंडागळे आणि शिवव्याख्याते मदनजी पाटील उपस्थित होते. मंचावर विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे, जेष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे, सांस्कृतिक प्रमुख सौ. वैशाली मांजाटे तसेच कार्यक्रमाचे संयोजक व समन्वयक दशरथ चिभडे उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील १३ विद्यार्थ्यांनी संविधान दिनाविषयी माहितीपर मांडणी आणि प्रभावी भाषणे सादर केली. शिवव्याख्याते मदन पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आपल्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिबिंब डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये उतरवलेलं आहे. भारतीय संविधान हे फक्त कायद्यांचे पुस्तक नाही, तर सामान्य माणसाच्या स्वाभिमानाचे जिवंत घोषणापत्र आहे. या संविधानाने या देशातील शेवटच्या घटकाला अधिकार, समानता आणि न्याय दिला. लोकशाहीच्या या पवित्र दस्तऐवजाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”

रमेश खंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “संविधानाच्या प्रास्ताविकेत लिहिलेली ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ ही मूल्ये आपल्या वर्तनात, विचारात आणि व्यवहारात उतरली तरच संविधान खऱ्या अर्थाने जिवंत राहते. विद्यार्थी म्हणून आपण जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनणे हीच संविधानाला खरी अभिवंदना आहे.”

प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “शाळा ही संविधानिक मूल्यांची पहिली प्रयोगशाळा आहे. येथेच मुलांमध्ये मानवी हक्कांची जाणीव, सामाजिक समता आणि लोकशाही संस्कार रुजतात. विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करण्याबरोबरच त्यातील मूल्ये जीवनात जपण्याची प्रतिज्ञा करावी.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रद्धा बैरागी आणि कु. भक्ती लकडे यांनी केले तर कु. रेणुका खंडागळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी भारताचे संविधान घोष वाचन करण्यात आले आणि २६/११ च्या मुंबईतील भीषण आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संविधान सप्ताहानिमित्त विद्यालयात शासनाच्या परिपत्रकानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावामधून प्रभात फेरी काढून संविधान आधारित घोषणा देण्यात आल्या. चित्रकला स्पर्धा, संविधान विषयक प्रश्नमंजुषा, पथनाट्य, व्याख्यानमाला, मानवी साखळी, पोस्टर स्पर्धा, ‘संविधान विथ सेल्फी’ उपक्रम तसेच फलक लेखन अशा उपक्रमांनी विद्यालय परिसर जागृत आणि लोकशाहीमय वातावरणाने भारावून गेला. या सर्व कार्यक्रमांमध्ये इतिहास समिती प्रमुख दिलीप शिंगणे, समिती सदस्य संजय पिवटे, प्रा. सुधाकर सस्ते, प्रा. रमेश जगताप, प्रा. सुमित जाधव, नितीन शेळके, सौ. वैशाली मांजाटे, सुदाम चंद्रे,सौ. वंदना लकडे, देविदास दळवी, गजानन वाघमारे, राजेंद्र भवर तसेच समितीतील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. फलक लेखनासाठी कलाशिक्षक रवींद्र खानंदे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रम राष्ट्रनिष्ठा, लोकशाही मूल्ये आणि संविधानिक भावना यांचे संस्कार दृढ करण्याच्या संदेशासह यशस्वीपणे सपन्न झाला.

22
1496 views
  
1 shares