logo

महाराष्ट्रात पुन्हा संकट!! थंडीसोबत पावसाचीही शक्यता; २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान तळ कोकण, पश्चिम आणी मध्य महाराष्ट्रात पाऊस

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानाने पुन्हा एकदा पलटी मारली असून, राज्यावर दुहेरी संकट ओढवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एका बाजूला उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कडाक्याची थंडी वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्रासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घसरण नोंदवली जात आहे. नाशिकमध्ये पारा तब्बल 9.7 अंश सेल्सिअसवर घसरला, तर धुळे येथे सर्वात निचांकी 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 7.4 आणि परभणीत 8.4 अंश तापमान नोंदवले गेले. उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर स्पष्ट दिसत असून, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये गारठा आणखी वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी दिला आहे.
दुपारीही वातावरणात गारवा कायम असल्याने नागरिकांना दिवसभर थंडी जाणवत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी कमी तापमान नोंदवले जात आहे. त्यामुळे शाळकरी मुलांना सकाळच्या वेळात त्रास होत असल्याने अनेक पालकांनी शाळेचे वेळापत्रक उशिरा करण्याची मागणी सुरू केली आहे.

थंडी वाढत असताना पावसाचा अंदाज राज्यातील हवामानातील विसंगती वाढवणारा ठरत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्यामुळे हवामानात झपाट्याने बदल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निम्न दाबाचा प्रभाव कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दिसून येणार असून या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस झाल्यानंतर थंडीचा कडाका आणखी वाढण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याची शक्यता वाढत असल्याने अंदमान आणि निकोबार बेटांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. 21 नोव्हेंबरपासून चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळू शकतो, म्हणूनच मच्छिमारांना 23 नोव्हेंबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

थंडीसह पावसाचे सावट आणि चक्रीवादळाचा इशारा—या तिहेरी हवामान बदलामुळे संपूर्ण देशात वेगवेगळे हवामान अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्रात विशेषत: पुढील काही दिवसांत थंडी, गारठा आणि अनियमित पावसाचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता असल्याने सर्वांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

0
372 views