logo

विजयाचे शिल्पकार प्रभागामधील उमेदवारासोबत असलेल्या जोडीदारामुळे ठरणार

*प्रभागातील जोडीदार ठरणार विजयाचा शिल्पकार*

महेंद्रकुमार महाजन रिसोड

नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक 2025 करिता येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. 17 नोव्हेंबर ही नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून 18 तारखेपासून कोण अर्ज माघारी घेणार आणि कोण प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरणार हे नक्की होणार आहे परंतु शहरातील राजकीय वातावरण पाहता प्रत्येक प्रभागात तिरंगी लढती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी व महायुती याच्या व्यतिरिक्त युती आघाडीच्या राजकारणाचा फटका बसलेले परंतु जनमानसात चांगली प्रतिमा असणारे अनेक उमेदवार आपले नशीब अपक्ष म्हणून अजमावण्यास तयार झाले आहेत त्यामुळे युती आघाडीच्या राजकारणात आपली जागा घटक पक्षाला गेल्यामुळे नाराज झालेले व राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणारे अनेक तरुण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
प्रत्येक प्रभागात युती-आघाडी याच्या व्यतिरिक्त निवडणूक लढविणारे उमेदवार चुरस निर्माण करणार हे नक्की. नगराध्यक्ष पदासाठी महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये सरल लढत होईल असे वाटत असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माजी नगरसेवक सलीम भाई यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून एन्ट्री केल्यामुळे राजकीय गणित बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा च्या वतीने सुधाकर देशमुख उर्फ बाळासाहेब देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. बाळासाहेब देशमुख यांची नगराध्यक्ष पदासाठी ची तयारी मागील अनेक वर्षापासून सुरू आहे त्यांनी रिसोड शहरातील प्रत्येक प्रभागातील मतदारांशी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपला जनसंपर्क टिकून ठेवला आहे. आमदार अमित झनक यांच्याशी जवळीक ठेवून त्यांनी नगरपरिषद निवडणुकीची रणनीती तयार केली आहे. दुसरीकडे महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टी कडून ज्येष्ठ आणि अनुभवी नेते अनंतरावजी देशमुख यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर रिसोड नगरपरिषदला नगराध्यक्ष भाजपाचाच व्हावा यासाठी आपले कार्यकर्ते नेटाने कामाला लावले आहेत. महायुती संदर्भात अनेक दिवस संभ्रम वाढत असताना त्यांनी भगवानराव क्षीरसागर यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊन त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सुद्धा दिली.माजी खासदार भावना गवळी यांनी महायुतीला पाठिंबा देत महायुतीचा नगराध्यक्ष करण्याचा निर्धार करून विरोधकांना मोठी चपराक दिली आहे. भगवानराव क्षीरसागर हे रिसोड शहरातील सर्व परिचित असं व्यक्तिमत्व असून त्यांच्या परिवारामध्ये मुले सुना यांनी नगरसेवक व नगराध्यक्ष पद सुद्धा त्यांच्या परिवारात उपभोगले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते संपर्कात आहेतच त्यामुळे क्षीरसागर परिवाराला माजी खासदार आनंदराव देशमुख व भावना गवळी यांची साथ मिळाल्यामुळे त्यांचा विजय निश्चित होईल अशी चर्चा शहरात मतदारांकडून केली जात आहे. नगराध्यक्ष सरळ जनतेतून निवडून जाणार असल्यामुळे नगराध्यक्षाला प्रत्येक प्रभागातील आपल्या सोबत असलेले सोबती हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत एकमेकांचे सहकार्य घेतल्याशिवाय कोणालाही विजयाचा मार्ग सहज सोपा होणार नाही.तर प्रत्येक प्रभागात प्रत्येकी दोन नगरसेवक व प्रभाग 11 मध्ये तीन नगरसेवक निवडून द्यायचे असल्यामुळे प्रत्येक प्रभागात नगरसेवकाची जोडी फार विचारांती लावली जात आहे.प्रभागातील जातीचे समीकरण जुळवून मतदारांच्या संख्येचा विचार करून जोडी जुळवली जात आहे एका प्रभागातील एका पक्षाकडून किंवा एका पॅनल कडून लढणारे दोन उमेदवार हे एकमेकांची बाजू सांभाळणार आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये सामंजस्य व समन्वय असणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. काही प्रभागांमध्ये क्रॉस मतदान होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या जवळच्या मतदाराने स्वतःसह आपल्या सहकारी मित्राला सुद्धा मतदान करावे किंवा करून घेणे ही त्या उमेदवाराची जबाबदारी ठरणार आहे. नगरपरिषद मध्ये जोडीदाराला खूप महत्त्व असणार आहे. नगरसेवकांच्या उमेदवारांमध्ये एकमेकांच्या प्रति विश्वास आणि सहकार्याची भावना असेल तरच मतदार सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहिल व त्यांना मतदान करायला संकोच करणार नाही.परंतु स्वतःपुरता विचार करणाऱ्या आणि जोडीदाराला वाऱ्यावर सोडणाऱ्या संधीसाधू उमेदवाराला विजयाचा आनंद घ्यायचा असेल तर सहकार्याला विजयी करावेच लागेल म्हणून प्रभाग निहाय मतदान हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच मिळविता येते ही बाब अधोरेखित करणारी ठरणार आहे.प्रभागातील जोडीदार हाच खरा विजयाचा शिल्पकार ठरेलं.

2
774 views