
वंदे मातरम् चळवळीतील स्वातंत्र्य सैनिकांचा सरकारला विसर
वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमात आपली चूक सुधारण्याची शासनाला संधी
नांदेड, दि. ९
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, थोर पत्रकार अनंतराव भालेराव, यांच्यासह तत्कालीन औरंगाबाद (छ.संभाजीनगर) येथील इंटरमिजिएट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम् कृती समिती' स्थापन करुन त्या माध्यमातून हैदराबाद मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग नोंदवला. त्यासाठी आपले शैक्षणिक भवितव्य पणाला लावले ; परंतु नुकत्याच साजरा होत असलेल्या वंदे मातरम् गीताच्या दीडशे वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारसह राज्य सरकारलाही या स्वातंत्र्य सैनिकांचा विसर पडल्याचा खेद या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांनी व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा ठरलेले 'वंदे मातरम्' हे गीत दीडशे वर्षांपूर्वी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिले. विविध कालखंडात या गीताने स्वातंत्र्याची उर्मी जागृत करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. दि. 7 नोव्हेंबर रोजी या गीताच्या प्रकाशनाला दीडशे वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे अतिशय उत्साहात आयोजन झाले ; पण, निजामाच्या जोखडातून हैदराबाद मुक्तिसाठी वंदे मातरम् या नावाने जी स्वातंत्र्य चळवळ निर्माण झाली होती. त्याच्या आठवणी काही ठिकाणी लिखित स्वरुपात नमूद आहेत. त्यावरुन या स्वातंत्र्य सैनिकांचा सुद्धा या निमित्त यथोचित सत्कार होणे अभिप्रेत होती, अशी खंत अनेक जणांनी बोलून दाखविली.
हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये 'वंदे मातरम् सत्याग्रह' हे चळवळीचे सुवर्णपान होते. या चळवळीमध्ये युवा वर्गाचा सहभाग अत्यंत प्रभावी होता. भारताचे माजी पंतप्रधान कै. पी.व्ही. नरसिंहराव हे 'वंदे मातरम् कृती समिती'चे सदस्य होते. औरंगाबाद येथील इंटरमिजिएट कॉलेजमधील शिकणारे विद्यार्थी या चळवळीच्या केंद्रस्थानी होते. येथूनच या सत्याग्रहाची सुरुवात झाली व पुढे ही चळवळ व्यापक झाली. शासनाला या चळवळीचा पडलेला विसर अनेकांना खटकला. हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक कै. गोविंदराव देशमुख यांच्या वारसाकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रे व त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित गौरविका या स्मरणिकेमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामातील वंदे मातरम चळवळीतील आठवणी संग्रहित आहेत.
1938 मध्ये औरंगाबाद येथे कॉलेजच्या वस्तीगृहात दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी म्हणून गोविंदराव देशमुख राहत होते. त्यावेळी मुस्लिम विद्यार्थी नमाज पडत व इतर 'वंदे मातरम्' हे गीत म्हणत. प्राचार्यांनी 'वंदे मातरम्' हे गीत गाण्यात बंदी केली. हैदराबाद येथील वस्तीगृहात हे गीत गायले जात असताना येथेच ते नाकारण्यात येत आहे अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार हे गीत नसून त्याला स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी पार्श्वभूमी आहे असे सांगून सर्वच महाविद्यालयीन वस्तीगृहात या गीतास बंदी घालण्यात आली. या बंदी विरोधात विद्यार्थ्यांनी अन्न सत्याग्रह केला. हा सत्याग्रह रोखण्यासाठी निजाम सरकारने आटोकाट प्रयत्न केले. पण विद्यार्थ्यांनी माघार घेतली नाही.
प्राचार्यांनी शेवटी वंदे मातरम समर्थकांना महाविद्यालयामधून बाहेर काढण्याची धमकी देऊन पाहिली. पण विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम होते. प्राचार्यांनी शेवटी 'वंदे मातरम्' समर्थकांना महाविद्यालयातून काढून टाकले. त्यांना स्थलांतरित दाखलाही नाकारला, त्यामुळे पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. पण हैदराबादचे रामचंद्रराव अंतू व लक्ष्मणराव गाणं यांच्या पुढाकाराने स्थापन पालक समितीने नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी.जे .केदार यांच्याकडे प्रयत्न केल्यानंतर विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठात प्रवेश मिळाला गोविंदराव देशमुख यांचे औरंगाबाद मध्ये माध्यम उर्दू असताना नागपूर विद्यापीठातून इंग्रजी माध्यमांची इंटरची परीक्षा दिली व ते विद्यापीठातून प्रथम आले.
डिसेंबर 1938 मध्ये काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोविंदराव देशमुख यांच्याबरोबरच अनंत भालेराव, सुंदरलाल सावजी (जिंतूर), रघुनाथराव रांजणीकर, ऍड. व्ही व्ही छत्रपती (परभणी), निवृत्त न्यायाधीश व्यंकटेश देशपांडे, ज.रा. बर्दापूरकर (अंबाजोगाई), केशव श्रीपाद देशपांडे (नांदेड), द यांच्यासह 58 सत्याग्रहींची सदर कॉलेजच्या अधिकृत रजिस्टर मध्ये आहे. वंदे मातरम् सत्याग्रहामध्ये भाग घेणारे एक विद्यार्थी ज.वा. कुलकर्णी (निवृत्त जिल्हाधिकारी) यांच्या हाती लागलेल्या दैनंदिनी मधील नोंदीप्रमाणे प्रमाणे वंदे मातरम् समितीचे अध्यक्ष अच्युता रेड्डी तसेच पी.व्ही. नरसिंहराव, श्रीनिवास छल्लावार, जगन्नाथ राव चंद्रकी यांचाही समावेश होता.
'हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा', या अनंत भालेराव लिखित ग्रंथामध्ये 'वंदे मातरम्' चळवळीचा समग्र आढावा घेण्यात आलेला आहे. नागपूर विद्यापीठाची परीक्षा संपल्यानंतर वंदे मातरम चळवळीतील विद्यार्थ्यांना नोकरीत अथवा महाविद्यालयात प्रवेशासाठी निजाम सरकारकडून माफीनाम्याची अट घालण्यात आली होती ; परंतु वंदे मातरम् चळवळीच्या प्रभावामुळे गोविंदराव देशमुख यांनी ही अट झुगारून 1939 मध्ये पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या नूतन विद्यालय या राष्ट्रीय शिक्षण संस्थेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 'वंदे मातरम् चळवळ' हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक घडविण्याचे शक्ती स्थळ ठरले.
--------प्रतिक्रिया
शासनाची कृती खेदजनक
देशभर वंदे मातरम गीताची 150 वी स्मृती जागविण्याचा जल्लोष झाला. हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये वंदे मातरम् चळवळीचे मोलाचे स्थान होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग हे या चळवळीचे वैशिष्ट्य होते ; परंतु शासन दरबारी एवढ्या मोठ्या लढ्याची कुठेही नोंद नसावी ही खेदजनक बाब आहे. या लढ्यामध्ये आमच्या वडिलांनी घेतलेला सहभाग आम्हा वारसाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. या गीताचा सोहळा वर्षभर चालणार आहे. त्यामुळे येत्या काळात शासनाने आपली चूक सुधारावी व चळवळीतील स्वातंत्र्य सैनिकाच्या कार्याची नोंद घ्यावी.
- सतीश कुळकर्णी मालेगावकर
( वंदे मातरम् चळवळीतील स्वातंत्र्य सैनिकाचे वारस )