logo

खंडेराजुरी विकास सोसायटीच्या रेशन दुकानात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई सुरु

खंडेराजुरी (ता. मिरज) येथील ब्रह्मनाथ विकास सोसायटीच्या रेशन दुकानात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी पुरवठा विभागामार्फत आज रेशनधारकांचे जाबजबाब घेण्यात आले.
खंडेराजुरी (ता. मिरज) येथील ब्रह्मनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत चालविण्यात आलेल्या रेशन दुकानात सप्टेंबर-२०२५ मध्ये कार्डधारकांची बायोमेट्रिक नोंद घेऊन पावत्या तयार केल्या; मात्र त्या प्रत्यक्षात लाभार्थीना दिल्या गेल्या नाहीत.पावत्या गहू वितरणबाबत दाखवल्या तरी लाभाध्यर्थ्यांना एक किलोही गहू मिळालेला नाही. दुकानदारांनी “गहू आला नाही”, असा दावा केला.
या तक्रारीनुसार मिरज तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी गंभीर दखल घेऊन पुरवठा विभागाला रेशन दुकान सील करण्याचे आदेश दिले होते. पुरवठा विभागाने गेल्या आठवड्यात रेशन दुकान सील केले होते.तक्रारदार शहाजी संभाजीराव पाटील व विनोद कोळी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला अनुसरून आज पुरवठा विभागामार्फत खंडेराजुरीतील रेशनधारकांचे जाबजबाब घेण्यात आले.
शासनामार्फत मोफत वाटप करण्यात आलेल्या धान्याच्या काळा बाजारप्रकरणी मिरज पूर्व भागातील सर्वच गावांत संतापाची लाट उसळली आहे.जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी पूर्ण करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी रेशनधारकांतून करण्यात येत असून या कारवाईकडे मिरज पूर्व भागाचे लक्ष लागले आहे.

42
2649 views