
कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम कमी झाले- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के
राहुरी विद्यापीठ, दि. 31 ऑगस्ट, 2025 शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढीकरिता योग्य निविष्ठांचा वापर केला पाहिजे. आज शेतीमध्ये विविध कामांसाठी मजुरांची अडचण भासत आहे. अशावेळी शेतीमधील विविध कामे करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. शेतीमधील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम कमी झाले आहेत असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण काळाची गरज या विषयावरील विद्यापीठात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड होते. यावेळी कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख डॉ. तुळशीदास बाष्ठेवाड, कृषी भूषण महिला शेतकरी सौ. प्रभावती घोगरे, कृषी यंत्र व अवजारे प्रकल्पातील डॉ. रविकिरण राठोड, प्रा. महेश पाचारणे व डॉ. संजय भांगरे उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. रवींद्र बनसोड म्हणाले की कृषी क्षेत्रामध्ये होत असलेल्या यांत्रिकीकरणामुळे या क्षेत्राची परावलंबतेकडून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होत आहे. शेतीमधील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ तसेच पैशाची बचत होऊन याचा फायदा त्यांच्या उत्पन्नवाढीमध्ये होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. बनसोड यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा सहभाग याविषयी सखोल माहिती दिली. यावेळी झालेल्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ. तुळशीदास बाष्ठेवाड यांनी राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे, डॉ. सचिन नलावडे यांनी आधुनिक शेतीमध्ये ड्रोनचे महत्व, डॉ. रवीकिरण राठोड यांनी ऊस शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण, प्रा. महेश पाचारणे यांनी फळबागेसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण आणि डॉ. संजय भांगरे यांनी कृषी अवजारे व यंत्रे निगा, देखभाल व दुरुस्ती याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. सचिन नलावडे, सौ.प्रभावती घोगरे व श्री. मच्छिंद्र घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुळशीदास बाष्ठेवाड यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश पाचारणे यांनी तर आभार डॉ. संजय भांगरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी हनुमंतगाव, हसनापूर, लोणी,सात्रळ इ. गावांमधून शेतकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजि. सलीम शेख, इंजि. मयूर शिंदे, इंजि. गिरीश भनगे आणि सर्व तांत्रिक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.