logo

आरोपीने मुलीवर कोयत्याने ४४ वेळा केले वार; कोणीही त्याची केस लढू नका; कुटुंबाचा आक्रोश

पुण्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येमुळे सध्या खळबळ माजली आहे.

बिबवेवाडी परिसरात कबड्डी खेळत असताना कोयत्याने वार करुन तिची हत्या करण्यात आली.

या धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीची केस कोणी लढू नये असं सांगत आक्रोश व्यक्त केला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान मुलीवर आरोपीने ४४ वेळा वार केल्याची माहिती मुलीच्या मामाने दिली आहे.“तीन महिन्यापूर्वी आरोपीने मुलीला त्रास दिला होता.

तेव्हा मी त्याला समज दिल्यानंतर तो शांत झाला होता. मात्र काल त्याने तिच्यावर वार करून खून केला. आरोपीला अडवण्याचा प्रयत्न तेथील मुलींनी केला. मात्र तो वार करीत राहीला.

त्याने तिच्यावर ४४ वार केले आहेत. या आरोपीची केस कोणीही लढू नये आणि फास्ट ट्रॅक कोर्टातून लवकरात लवकर न्याय मिळावा,” अशी मागणी मयत मुलीचे मामा अमोल शिंदे यांनी केली आहे.“काल सायंकाळच्या सुमारास मयत मुलगी कबड्डीचा सरावासाठी यश लॉन्स येथील परिसरात गेली होती.

तेव्हा मुख्य आरोपीसह चौघे जण दुचाकीवरून तिथे गेले. मुलीस बाजूला घेऊन तिच्यावर कोयत्याने आणि चाकूने वार केले. या घटनेत तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही तासात मुख्य आरोपीसह चौघांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपी मयत मुलीच्या घराशेजारी पाच वर्ष राहत होता. मात्र साधारण वर्षभरापूर्वी दुसरीकडे राहण्यास गेला होता. आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे,” अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.“पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल,” असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.“यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांनी दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना पुढे म्हटलं की, “अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत”.

63
14668 views
  
23 shares