logo

कोरोना चं थैमान सुरू; सोमवार ठरला भयंकर! जगातल्या 4 मोठ्या शहरांत Lockdown.......

सिडनी: ऑस्ट्रेलियात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून चार प्रमुख शहरांमधील लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये कोरोना विषाणूनं सर्वाधिक हाहाकार उडवून दिल्याचं चित्र आहे. सिडनीतल्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.सिडनीमध्ये गेल्या 7 आठवड्यांपासून लॉकडाऊन लावण्यात आला असून सोमवारपासून सुरू झालेला आठवा आठवडाही लॉकडाऊनचाच असणार, हे निश्चित झालं आहे.

1.5 ट्रिलियन डॉलरच्या ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेसमोर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मोठं आव्हान निर्माण केलं आहे.ऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये मृत्यूंचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचं चित्र असून गेल्या 24 तासात 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या महिन्यातील एका दिवसांत नोंदवलेला गेलेला हा सर्वोच्च आकडा असल्याचं ऑस्ट्रेलियन प्रशासनानं सांगितलं आहे.


सिडनीमध्ये एका 15 वर्षांच्या मुलाचाही कोरोनानं बळी घेतला आहे. 11 जुलैपासून आतापर्यंत सिडनीमध्ये एकूण 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ऑस्ट्रेलियात कोरोनामुळे गेलेल्या एकूण बळींची संख्या 966 वर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा आणि डार्विन या चारही प्रमुख शहरात कडक निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.मृत्युची आकडेवारी वाढत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारनं सैन्याला रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. सिडनीत वेगवेगळ्या भागात 200 सैनिक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले असून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर ते बारीक लक्ष ठेऊन आहेत. कुठेही गर्दी होऊ नये आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी सैन्याला रस्त्यावर उतरवत असल्याची माहिती ऑस्ट्रेलियन प्रशासनानं माध्यमांना दिली आहे.

13
14679 views
  
4 shares