logo

पतीच्या विरहाने पत्नीनेही सोडला प्राण

लातूर : सत्तेचाळीस वर्षापासून संसारात साथ देणाऱ्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे दु:ख सहन न झाल्याने अवघ्या काही वेळेतच पत्नीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा उस्तुरी येथे घडली आहे.

पती-पत्नीचा एकाच दिवशी झालेला मुत्यू आणि आई–वडीलांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैवी प्रसंग मुलांवर आलेला आला आहे.निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथील सिद्रामप्पा व ललिता या ईटले दाम्पत्याने अवघी हयात शेती कसून कष्टाने आपला उदरनिर्वाह भागवला.

धार्मिक संस्कार असलेल्या या पती-पत्नीने संसाराचा गाडा ओढत असताना 47 वर्षात अनेक चढउताराच्या प्रसंगांना सामोरे जात गोडीगुलाबीने संसार थाटला. या दाम्पत्याला 4 मुले आहेत.यामध्ये मोठ्या मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत असल्याने मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी शेती विकून मुलाला शिकविण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेऊन मुलाला प्राध्यापक केले.

हाच मुलगा गावातुन सेट नेट उत्तीर्ण व पीएच.डी पुर्ण होणारा पहिला विद्यार्थी ठरला. याचबरोबर 6 जुन रोजी शेवटच्या मुलाचा लग्न करून देत या दाम्पत्याने पारिवारिक सर्व कर्तव्य पुर्ण केले.दरम्यान आज सकाळी 8 वाजता सिद्रामप्पा ईटले हे आंघोळ करून चहा घेत होते. त्याचदरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन ते जमिनीवर कोसळले. त्यामुळे कुटुंबियांनी डॉक्टरांना बोलावून आणले व तपासणी केली असता त्यांचा प्राण गेला होता. पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच ललिताबाई ईटले यांनाही हृदयविकाराचा झटका आला व त्यांचाही जागीच मृत्यू झाला.पतीच्या निधनाची वार्ता गावात सर्वत्र पोहोचले असतानाच अवघ्या काही वेळातच पत्नीनेही प्राण सोडल्याची वार्ता गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी चौथ्या मुलाचे लग्न करून आनंदात असलेल्या या कुटुंबात आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

5
14661 views
  
6 shares