logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ग्रामपंचायतीचा संवेदनशील उपक्रम आणि मृत्यू दाखल्याचा सुपूर्द; ग्रामस्थांकडून स्वागत

लोणी : प्रतिनिधी:- तेजस वाळुंज
ग्रामस्थांच्या दुःखाच्या प्रसंगी प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढे येत मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने लोणी ग्रामपंचायतीने एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत गावातील दिवंगत नागरिकांच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच त्यांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायतीच्या वतीने ‘मृत्यू दाखला’ आदरपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात कै. सुखदेव येधू गायकवाड यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी गायकवाड कुटुंबीयांना मृत्यू दाखला प्रदान करत संवेदना व्यक्त केल्या.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामागे केवळ प्रशासकीय कामकाज नसून, गावासाठी योगदान दिलेल्या व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असल्याचे सांगण्यात आले. तसेच दुःखाच्या काळात शोकाकुल कुटुंबियांना मृत्यू दाखल्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, हा देखील या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
ग्रामपंचायतीने या उपक्रमासोबतच घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न केला आहे. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना अशा सेवांचा अधिक वेगाने लाभ मिळू शकतो, असा सकारात्मक संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
लोणी ग्रामपंचायतीच्या या संवेदनशील आणि लोकाभिमुख उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत असून, इतर ग्रामपंचायतींनीही असा आदर्श घ्यावा, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रसंगी अशोक आदक पाटील, बबन वाळुंज पाटील, संतोष थोरात, आणि राजेंद्र वाळुंज पाटील ( उपसरपंच लोणी) हे उपस्थित होते.

27
3166 views

Comment