logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नोकर भरती चौकशीचा खोटा अहवाल देण्यासाठीही उपनिबंधकाने घेतली लाच


जळगाव : अवैध सावकारीबाबतचा
अनुकूल अहवाल पाठविणे व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी एक लाख ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक असलेले सहकार विभागाचे तालुका उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी (५६, रा. शांतीनगर भुसावळ) यांना दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतपेढीमधील नोकर भरतीविषयी असलेल्या तक्रारीच्या चौकशीचाही खोटा अहवाल देण्यासाठी बारी यांनी लाखो रुपयांची लाच घेतल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे.

अवैध सावकारीविषयी सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाकडे सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होवू नये तसेच सावकारीबाबत अनुकूल चौकशी अहवाल पाठविण्यासाठी एक लाख ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपनिबंधक जगदीश बारी व जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी देविदास धनसिंग पाटील (४४, रा. शिवाजी नगर) या दोघांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत २३ मे रोजी संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले

खोट्या अहवालासाठी लाच घेतल्याची तक्रार

सन २०२० मध्ये जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतपेढीत झालेल्या नोकर भरतीच्या तक्रारीची चौकशी उपनिबंधक जगदीश बारी यांच्याकडे दिली होती. त्यांनी चौकशीचा खोटा अहवाल देण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष व इतरांना हाताशी धरुन लाखो रुपयांची लाच घेतल्याची. तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे.

13
937 views

Comment