
केंद्राने साखरेचा किमान विक्री दर रु. 41 करावा - हर्षवर्धन पाटील
केंद्राने साखरेचा किमान विक्री दर रु. 41 करावा - हर्षवर्धन पाटील
-केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचेकडे मागणी
•इथेनॉल दरवाढीची व कोटा वाढवण्याची मागणी
इंदापूर : प्रतिनिधी दि.19/11/25
साखर कारखान्यांचा साखरेचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत चालल्याने साखर उद्योगाला दिलासा देणेसाठी, साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रति किलोस रु.41 करावा. तसेच इथेनॉल दर वाढ करावी व साखर कारखान्यांसाठी इथेनॉलचा चालू हंगामासाठीचा कोटा आणखी 50 कोटी लिटरने वाढवून द्यावा, अशी मागणी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्राद्वारे बुधवारी (दि. 19 नोव्हें.) केली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांचेकडून केंद्र सरकारला देशातील साखर उद्योगांसमोरील समस्यांबाबत सविस्तर पत्र बुधवारी देण्यात आले. त्या संदर्भातील माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारने सन 2025-26 गळीत हंगामासाठी 15 लाख मे. टन साखर निर्यातीस दिलेल्या परवानगीचे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने स्वागत केले आहे. या संदर्भात केंद्र सरकारने तातडीने रिलीज ऑर्डर काढावी, त्यामुळे देशातील साखर कारखान्यांना निर्यात साखरेच्या विक्री संदर्भात लवकर व्यवस्था करता येईल, अशी मागणी अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
साखरेच्या किमान विक्री दरात गेली 6 वर्षांपासून वाढ झालेली नाही. मात्र दुसऱ्या बाजूला उसाच्या एफआरपीची रक्कम प्रत्येक वर्षी वाढत असून, एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवरती अदा करणेसाठी साखरेचा किमान विक्री दर प्रति किलोस रु. 41 करणे आवश्यक आहे, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. साखरेचा किमान विक्री दर वाढविल्यास कारखान्यांकडीला साखरेच्या साठ्याचे मूल्यांकन वाढेल, परिणामी साखर उद्योगाला दिलासा मिळेल असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
तसेच इथेनॉलच्या खरेदी किंमतीच्या दरामध्ये सन 2023-24, 2024-25 आणि 2025-26 हंगामामध्ये वाढ झालेली नाही. आता व्याज अनुदान योजनेची 5 वर्षांची मुदत संपली आहे, त्यामुळे डिस्टिलरी प्रकल्प उभारणाऱ्या साखर कारखान्यांवर व्याजाचा भार वाढला आहे. त्यामुळे इथेनॉलच्या विशेषतः बी-हेवी मोलॅसेस आणि ज्यूस/सिरप आधारित इथेनॉलच्या दरात वाढ करण्यात यावी. त्याचप्रमाणे इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त 5 लाख मे. टन साखर वळवण्याची परवानगी देण्यात यावी, त्यामुळे सुमारे 30 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन घेता येईल. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले अदा करण्यास मदत होईल, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी दि. 19 पाठविलेल्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे. या सर्व मागण्यांवर केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असा आशावाद अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे.