logo

लग्नमंडपात नवरदेवावर चाकू हल्ला, बायको स्टेजवर बेशुद्ध ! 1 किलोमीटरपर्यंत ड्रोन कॅमेराने पाठलाग; थरारक Video मध्ये कैद....

अमरावतीमध्ये एक थरारक घटनाक्रम घडला असून आश्चर्याची बाब म्हणजे हल्लेखोर चक्क ड्रोन व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. येथील बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात रात्री अचानक नवरदेवावर काही इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र हल्ल्याचा संपूर्ण थरार लग्नाच्या शुटींगसाठी वापरण्यात आलेल्या ड्रोन कॅमेरात कैद झालाय.

नवरदेवावर हल्ला

अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात काल रात्री अचानक गोंधळ उडाला. साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजलराम समुद्रे या तरुणाचा विवाहसमारंभ सुरू असताना या लग्न समारंभात एक विचित्र प्रकार घडला. दोन युवकांनी नवरदेव सुजलराम समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ 'झी 24 तास'च्या हाती आलेत.

बायको बेशुद्ध पडली

अचानक झालेल्या या हल्ल्यात नवरदेव सुजलराम जखमी झाला. नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नववधू जागेवर चक्कर येऊन पडली. मुलावर हल्ला झाल्याचं पाहताच नवरदेवाचे वडील आरोपींना पकडायला त्यांच्या मागे धावले.

नवरदेवाच्या वडिलांनी केला पाठलाग

अगदी मंडपाच्या बाहेरपर्यंत नवरदेवाच्या वडिलांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला. मात्र नवरदेवाचे वडील आपल्या पाठी येत असल्याचं पाहून हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नही ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दोन हल्लेखोर आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेले. मात्र हल्ला झाल्यापासून ते अगदी बाईकवर बसून हायवेवरुन पळून गेलेल्या हल्लेखोरांचा संपूर्ण व्हिडिओ ड्रोन कॅमेरात कैद झाला.
नक्की वाचा >> सांगलीत मुळशी पॅटर्न स्टाइल मर्डर! वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान स्टेजवरच दलित महासंघाच्या प्रमुखाला...

नवरदेव गंभीर जखमी

या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार जखमी सुजल समुद्रे हा टिळक नगर परिसरातील रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

परिसरात एकच खळबळ

या आरोपीचा शोध आता बडनेरा पोलीस घेत असून यापूर्वी देखील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही आरोपींनी धाब्यावर महिलेस मारहाण केली होती. त्यामुळे बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा गुन्हेगारावर वचक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.

184
9187 views