logo

शाळकरी मुलांना मारहाण निषेधार्थ अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीने भिगवण बंद

२५ जणांच्या जमावाने भिगवणमधील दोन शाळकरी मुलांना बेदम मारहाण केली होती. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीने भिगवण बंद पाळण्यात आला.
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास २५ जणांच्या जमावांनी दोन शाळकरी मुलांना किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात बेदम मारहाण केली होती. या घटनेमध्ये भिगवण पोलिसांत भिगवण ग्रामपंचायत सदस्यांसह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यातील एक जणालाच पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होते. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी अमरबौद्ध युवक संघटनेच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी संपूर्ण भिगवण शहर बंद ठेवण्यात आले होते. यामुळे बाजारपेठेत सगळीकडे शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. या वेळी अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीने आंबेडकर चौकामध्ये निषेध सभा आयोजित करण्यात आली. झालेली घटना निंदनीय असून, भिगवण पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची या वेळी कार्यकर्त्यांनी प्रखर मागणी केली. दरम्यान, याबाबतचे निवेदन भिगवण पोलिसांना देण्यात आले.
बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

3
148 views