नाशिकमध्ये 42 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार ; चार जणांना अटक
नाशिक :- राज्यात दिवसेंदिवस अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. नाशिकमधील वणी येथे एका महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा मित्र बसस्थानक परिसरात बसले होते. तेव्हा या परिसरात असलेल्या संशयितांनी त्यांना येऊन धमकी दिली आणि पीडितेवर बुधवारी रात्री अकरा वाजता सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात सामूहिक बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि या प्रकरणातील चारही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिकसारख्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असतील तर आरोपींना पोलिसांचा जराही धाक राहिलेला नाही का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. आरोपी धमकी देता, त्यानंतर सामूहिक अत्याचार करतात. बसस्थानक परिसरात अशा घटना घडतात. आरोपींच्या मनात पोलिसांविषयी भीती राहिलेली नाही. त्यातूनच या अशा घटना घडत आहेत, असे मत आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.