logo

भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची भाऊगर्दी

भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची भाऊगर्दी

दोन दिवसात ६५० पेक्षा अधिक अर्ज दाखल; उद्या अंतिम दिवस

लातूर (प्रतिनिधी) :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपाकडून लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांकडून लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने अर्ज स्वीकृतीस प्रारंभ झाला आहे. या प्रक्रियेसाठी इच्छुकांनी मोठी भाऊगर्दी केलेली पाहण्यास मिळत आहे. दोनच दिवसात ७० जागांसाठी ६५० पेक्षा अधिक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केले आहे. इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या दिनांक १० डिसेंबर २०२५ हा अंतिम दिवस असून इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत असे आवहान शहर जिल्हा भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.

लातूर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच मनपा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ केला आहे. प्रदेश भाजपाकडून आलेल्या सूचनेनुसार हि प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर व निवडणूक प्रमुख डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, मनपाचे माजी गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. भाजपाच्यावतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांची मोठी संख्या असल्यामुळे शहर भाजपा कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शहरातील अठराही प्रभागातून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने शहर जिल्हा कार्यालय गर्दीने फुलून गेलेले पाहण्यास मिळत आहे. दोनच दिवसात उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या ६५० पेक्षा अधिकची झाली आहे.

प्रदेश भाजपकडून आलेल्या सूचनेनुसार हि प्रक्रिया सुरु असून या सर्व इच्छुकांची यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. उमेदवारी निश्चितीसाठी उर्वरित प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याने इच्छुकांना आपला अर्ज दाखल करण्यासाठी उद्या गुरवार दिनांक १० डिसेंबर २०२५ शेवटचा दिवस असणार आहे. लातूर शहर जिल्हा भाजपा कार्यालय सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जात असून इच्छुकांनी आपले अर्ज वेळेत दाखल करावेत असे आवाहन शहर जिल्हा भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

1
0 views